ठाणे: ठाणे महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना अखेर न्याय मिळाला असून तीन कार्यालयीन अधीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा पूर्ण वेळ अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
आस्थापना अधिक्षक रंजू पवार यांच्याकडे वर्तकनगर, भालचंद्र घुगे यांना लोकमान्य सावरकरनगर तर लक्षिमन गरुडकर यांच्याकडे वागळे प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाची महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोपवली. वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र खोले यांची भिवंडी तहसीलदारपदी बदली झाली होती तर इतर दोन प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाच्या जागा रिक्त असल्याने तेथे त्यांची बदली करण्यात आली आहे.
महापालिकेत नऊ प्रभाग समिती आणि इतर विभाग अशा १८ सहाय्यक आयुक्त पदाच्या जागा आहेत. त्यापैकी निम्म्या जागा रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्या जागी शासनाकडून अधिकारी येण्यास विलंब लागतो, त्यामुळे एका एका अधिकाऱ्याला अन्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपावावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनी स्थानिक अधिकाऱ्यांना पूर्ण वेळ पदभार देऊन स्थानिक अधिकाऱ्यावरील अन्याय दूर केला, अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.