माहुली किल्ल्यावर अडकलेल्या दोन जखमी तरुणांची थरारक सुटका

जीवरक्षक टीमची १० तासांची धाडसी मोहीम यशस्वी

शहापूर: शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला येथे रस्ता चुकून जखमी अवस्थेत अडकलेल्या दोन तरुणांची जीवरक्षक टीमने तब्बल दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका केल्याची घटना मंगळवारी घडली. या धाडसी मोहिमेमुळे दोन्ही तरुणांचे प्राण वाचले असून जीवरक्षक टीमच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंगळवारी सकाळी सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास शहापूर पोलीस स्टेशन येथून जीवरक्षक टीमला तातडीचा कॉल प्राप्त झाला. माहुली किल्ल्यावर ट्रेकसाठी गेलेले दोन तरुण रस्ता चुकून दरीच्या भागात अडकले असल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी एका तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तर दुसऱ्या तरुणाच्या पायाला दुखापत झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या समन्वयाने जीवरक्षक टीमने ता
त्काळ शोधमोहीम सुरू केली. कठीण डोंगर-दऱ्या, खडतर चढ-उतार आणि प्रखर उन्हाचा सामना करत टीमने सुमारे तीन तास परिसरात शोध घेतला.
अखेर एका दरीच्या कडेला झाडाच्या आडोशाला बसलेल्या अवस्थेत दोन्ही तरुण आढळून आले. ते अत्यंत थकलेले व जखमी अवस्थेत असल्याने टीमने तत्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचून पाणी व बिस्किटे देत त्यांना धीर दिला. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने आणि संयमाने त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पवई येथील आयआयटीचे विद्यार्थी असलेल्या उदय येन्नामपल्ली व त्याचा मित्र सोभिन मायलुस्वामी अशी ट्रेकर्सची नावे आहेत. सुमारे दहा तास चाललेल्या या थरारक मोहिमेनंतर अखेर संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही तरुणांना सुरक्षितपणे किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात टीमला यश आल्याची माहिती जीवरक्षक टीमचे समीर चौधरी व रविंद्र मडके यांनी दिली.

या धाडसी बचाव मोहिमेत रघुनाथ आगिवले, भूषण विशे, गुरुनाथ आगिवले, केतन आगिवले, रितेश देशमुख, श्रीकांत देशमुख, पवन हंबीर, समीर जावरे, अक्षय देशमुख, हर्षद आगिवले, योगेश आगिवले, अर्जुन आगिवले तसेच इतर सदस्यांनी सहभाग घेतला.
जीवरक्षक टीमच्या या धाडसी आणि जीव वाचवणाऱ्या कार्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

माहुली किल्ल्यावर अडकलेल्या दोन तरुणांची माहिती मिळताच तातडीने जीवरक्षक टीमशी समन्वय साधून शोधमोहीम सुरू करण्यात आली. डोंगराळ आणि कठीण परिसरातही टीमने अत्यंत धाडस व संयम दाखवत दोन्ही तरुणांना सुरक्षित खाली आणले. अशा मोहिमांमध्ये जीवरक्षक टीमचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या युवकांनी योग्य तयारी व खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.