शीघ्रकृती दल पथकाची थरारक प्रात्यक्षिके

दहशतवादी हल्ल्याचे जिवंत प्रात्यक्षिके पाहून ठाणेकर रोमांचित

ठाणे : एखादा दहशतवादी हल्ला झालाच तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ठाणे पोलिसांचे शीघ्रकृती दल कसे सज्ज आहे, याचा थरार ठाणेकरांनी आज अनुभवला.

पोलिस वर्धापन दिनानिमित्त रोप लँडींगपासून दहशतवाद्यांना यमसदनी धाडेपर्यंतची आणि एखादे वाहन हायजॅक झाल्यानंतर अपहृत नागरिकांची सुटका करण्याची प्रात्यक्षिके यावेळी दाखवण्यात आली.

नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच ठाण्यामध्ये दहशतवादी कारवाई झाली तर आपले पोलिस दल त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी किती सक्षम आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत नेहमी तत्पर असलेले पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या जवान त्यासाठी हातात रायफल घेऊन तयार होते. आधी त्यांचे संचलन झाले. रायफल हाताळण्याची कसब दाखवण्यात आली. त्यानंतर मैदानातच आभासी इमारत तयार करून तेथे दोन दहशतवादी दाखवण्यात आले. खबर मिळताच हे जवान हेलिकॉप्टरमधून कसे रोप लँडींग करतात, हे इमारतीच्या गच्चीचा आधार घेऊन दाखवण्यात आले. दहशतवाद्यांना यमसदनी धाडून बॉम्बशोधक पथकापर्यंत जेजे अशा कारवायांमध्ये घडते ते दाखवण्यात आले. यावेळी घटनास्थळी आलेल्या डॉग स्कॉडच्या श्वानानेही उपस्थितांची मने जिंकली.

हे प्रात्यक्षिक झाल्यानंतर शाळेची बस हायजॅक झाल्याचे नाट्य करत बचाव कार्याचा थरार दाखवण्यात आला. दरम्यान यावेळी पोलिस विभागातील विविध कक्ष आणि विभागांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. या अनोख्या आणि साहसी कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून पालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. वैâलास पवार उपस्थित होते. तसेच परिवहन अधिकारी जयंत पाटील, अभिनेते भाऊ कदम, विजू माने, कुशल बद्रीके यासह अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती.