भाईंदर : मीरारोडमधील तीन अल्पवयीन मुलींनी धुलीवंदनाला ( होळी ) गोव्याला फिरायचे जायचे ठरवले आणि त्यांनी चक्क गोव्याच्या दिशेने प्रवास देखील सुरू केला. अचानक बेपत्ता झालेल्या या तिन्ही मुलींचे कुटूंबीय पण यामुळे प्रचंड घाबरून गेले होते. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिन्ही मुलींना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून ताब्यात घेण्यात आले.
मीरारोड परिसरात राहणार्या या तीन अल्पवयीन मुली ज्यांचे वय अनुक्रमे ११ वर्ष, १३ वर्ष व १४ वर्ष असे आहे. सोमवारी सहा मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास या तीन अल्पवयीन मुली मिरागाव येथील वंदना चक्रे गार्डनमध्ये खेळण्यासाठी जातो असे घरातून सांगून गेल्या होत्या. मुली सायंकाळी सात वाजेपर्यंत घरी परत न आल्याने मुलींच्या पालकांनी त्यांच्या आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला. परंतु त्या मिळून न आल्याने काशिमीरा पोलीस ठाण्यात अपहरण व बेपत्ता असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे एका मुलीजवळ मोबाईल होता. ती मोबाईल बंद चालू करत होती. मात्र फोन केला असता ती प्रतिसाद देत नव्हती. म्हणून मोबाईलचे लोकेशन व ट्रेनचा टाईम मॅच केला असता त्यातून प्राप्त माहितीच्या आधारे मुली या मुंबईकडून गोव्याकडे मांडवी एक्सप्रेसमधून जात असल्याचे निष्पन्न झाले. सदर रेल्वेचे लोकेशन तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे असल्याने खेड पोलीसांशी संपर्क करून त्यांना मुलींची माहिती देण्यात आले. खेड पोलिसांनी तिन्ही मुलींना मांडवी एक्सप्रेसमधून ताब्यात घेवून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरुपपणे दिले. विशेष म्हणजे ६ तासांच्या आत शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदरची कामगिरी मीरा भाईंदर परिमंडळचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, मीरारोड सहायक पोलीस आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, सहायक पोलीस निरीक्षक टिकाराम थाटकर, पोलीस उपनिरीक्षक निखील चौहान, पोलीस हवालदार सुधीर खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलिसांच्या मदतीने केली आहे.