नवी मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील खारकोपर स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली. यामुळे खारकोपर ते नेरुळ दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मंगळवारी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली असून या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नेरूळ येथून खारकोपरच्या दिशेने जात असलेल्या ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञ पोहोचले आहेत. मदतकार्य सुरू आहे. लोकलचे डबे पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.घटनास्थळी पोहोचलेल्या रिलिफ ट्रेनच्या मदतीने प्रवाशांची पुढील रेल्वे प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण रुळावरून ट्रेनचे तीन डबे घसरल्यामुळे रेल्वेची हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत या मार्गावरील बेलापूर नेरुळ-खारकोपर मार्गांवरील वाहतूक बंद होती. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतर मार्गांवरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.