चोरीच्या एटीएम कार्डद्वारे हजारो रुपये लंपास; तिघांना अटक

भाईंदर: मुंबईसह मीरारोड, कांदीवली, बोरीवली, वसई, विरार परिसरात एटीएम कार्डची चोरी करुन, नंतर त्या एटीएम कार्डमधून पैसे काढणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा यांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे.

नवघर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष-१ चे अधिकारी करीत होते. घटनास्थळी प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही चित्रणाद्वारे व तांत्रिक विश्लेक्षणाद्वारे तपास करुन आरोपींना जेरबंद केले आहे.

भाईंदर पूर्वेच्या भालचंद्र कॉम्प्लेक्स, नवघर रोड येथे राहणारे अनिल जाधव (५९) हे भाईंदर पूर्वेला असलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये १७ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या खात्याचे मिनी स्टेटमेट काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे एटीएम कार्ड हे मशिनमध्ये अडकले. ते काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु ते निघाले नाही. त्यावेळी एटीएम सेंटरमध्ये एक अनोळखी इसम आला. त्याने जाधव यांना एटीएमचा पिन टाकण्यास सांगितले. जाधव यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पिन नंबर टाकून कॅन्सल बटन दाबले. परंतु एटीएम कार्ड बाहेर आले नाही. त्यानंतर जाधव यांनी त्यांचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी मित्रांना फोन केले. एटीएमच्या बाहेर आल्यानंतर एका अज्ञात इसमाने त्यांचे एटीएम कार्ड चोरी केले. त्यानंतर त्या एटीएम कार्डने वेगवेगळया एटीएममधून एकूण ५० हजार रुपये फिर्यादी यांच्या खात्यातून चोरी केले.

याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा गुन्हे शाखा कक्ष-०१ काशिमीरा हे समांतर तपास करत होते. घटनास्थळावरुन मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाव्दारेआरोपींची ओळख पटवून ते वापी, गुजरात याठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.वापी याठिकाणी पथक रवाना करुन आरोपी शिवशंकर रामू प्रसाद (२५) धंदा-मजुरी, रा. गाव झोझुरी, तालुका- बरखट्टा (झारखंड) प्रिन्स विनोद जयस्वाल (२८ धंदा-चालक, रु. सोमा रेसिडेन्सी, वापी, जि. वलसाड, गुजरात) उपेद्र सिंग रामप्रवेश सिंग (४५ धंदा मजुरी, रा. सोसायटी, ता-पलसाना, जि. सुरत) यांना गुंजन चौफुला, वापी, गुजरात या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नवघर पोलीस ठाणे, मीरारोड, वसई, विरार, मालाड, कांदीवली, बोरीवली, माहीम, जोगेश्वरी, अंधेरी यााठिकाणी देखील अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.