मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई: जे घराच्या बाहेर पडले नाहीत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची भाषा आमच्याबरोबर करत आहेत, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. त्यांनीच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, म्हणजेच 7 डिसेंबरपासून नागपूर इथे सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘ते म्हणतात गेल्या अडीच वर्षात केंद्र सरकारने त्यांना पैसे दिले नाही. तुम्ही मागायला हवे होते. तुमच्या अहंकारामुळे राज्यचे नुकसान केले. अनेक प्रकल्प बंद पाडले, अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यानंतर ती स्थगिती उठवण्यात आली. ते आम्हाला म्हणाले आम्ही स्वाभिमान हरवला आहे, दिल्लीत जातात, बाहुली आहेत. हो आम्ही दिल्लीला जातो. दिल्लीला जातो अन् निधीही आणतो.’
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ‘आम्ही आरक्षणाबाबत सुरुवातीपासून सकारात्मक आहोत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, कुणाचेही आरक्षण कमी होणार नाही, ही भूमिका आमची आहे. सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. कोर्टात टीकणारे मराठा आरक्षण देण्याचे काम सरकार करेल. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले.
सरकारने आयोजित केलेल्या चहा पानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला. आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी-पान ठेवावे लागेल, म्हणजे कदाचित ते येतील,’ असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.
नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनी पत्राद्वारे सरकारला सुचवली. धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिली निविदादेखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केली. त्यानंतर दुसरी निविदा काढली. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. यातील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारने तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत. गरिबातील गरिबांना घरं मिळता कामा नये, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.