ठाणे : ठाणे जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन आखले असून यासाठी विविध स्तरांवर तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी अंदाजे ५७०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी लागवड झाली होती. यावर्षी जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रात अंदाजे ५५० हेक्टरने वाढ होऊन एकूण क्षेत्र ६२५० हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या वाढीमुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांचे उत्पादन आणि उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाकडून मुबलक प्रमाणात बियाणे देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
रब्बी हंगाम हा पावसाळ्यानंतर सुरू होणारा आणि थंड हवामानात जोम धरून वाढणाऱ्या पिकांचा हंगाम. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली जाते आणि फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान पिकांची काढणी होते. या हंगामात जमिनीत नैसर्गिकरीत्या साठलेला ओलावा, दिवस-रात्रीचे तापमानातील फरक आणि थंड हवामानाचा फायदा घेत अनेक डाळी, गहू, गळीत धान्य, मका व हरभरा यांसारखी पिके चांगली वाढतात.
ठाणे जिल्ह्यातील भातपिकानंतर रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पूरक हंगाम मानला जातो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाकडून रब्बीचे नियोजन करण्यात येत आहे. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य विज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, जैविक खते आणि पीक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. रब्बी हंगामातील योग्य पिक निवड, पेरणी, संतुलित खतप्रयोग, जलसंधारण आणि रोगनियंत्रण या बाबतीतही गावोगावी कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली जात आहे.
यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात मका १५० हेक्टर, वाल/वाटाणा ३२५० हेक्टर, हरभरा २५०० हेक्टर आणि गळीत धान्य १०० हेक्टर आणि उर्वरित पिकांची उर्वरित क्षेत्रावर लागवड करण्याचे प्रस्तावित नियोजन करण्यात आले आहे. लागवडीसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करताना शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा यासाठीही जिल्हा कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हरभरा लागवडीसाठी तब्बल २१८ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. याशिवाय मसूर पिकासाठी ७०० मिनिकिटांचे वितरण होणार असून या मिनि किटांतून एकूण अंदाजे ५६ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध होईल. बीजप्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारे द्रवरूप रायझोबियम हे जैविक खतदेखील शेतकऱ्यांना पूर्ण अनुदानावर देण्यात येणार आहे. हे सर्व साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी महाबीजकडे मागणी नोंदवण्यात आली असून काहीच काळात त्याचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या लागवडीचे योग्य नियोजन केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे रब्बी हंगाम नियोजनाची आखणी करण्यात आली असून याविषयी शेतकऱ्यांमध्ये गावोगावी मोहिमा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली.