ग्रामस्थांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

कल्याण: टिटवाळ्याजवळील गुरवली गावात सोमवारी मध्यरात्री मोबाईल चोरी केलेल्या चोरट्याचा ग्रामस्थांनी पाठलाग केला. त्याला पकडून जबर मारहाण केल्याने या मारहाणीत या चोरट्याचा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीत मयत इसमाच्या पत्नीने संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून ग्रामस्थांनी देखील चोरी करायला आलेल्या इसमाविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

टिटवाळानजीक असणाऱ्या गुरवली गावात बनेली येथे राहणारा व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असगर अली अब्दुल रजाक शेख (36) हा आपल्या साथीदारासह एका घरातील मोबाईल चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना दळवी कुटुंबाला यादरम्यान जाग आली. मात्र तो मोबाईल घेऊन पळत असताना दोन ठिकाणी पडल्याने ग्रामस्थांच्या हाती अलगद सापडला. या दरम्यान त्याला लाकडी दांडक्याने व हाताने जबर मारहाण केली. या मारहाणीत रुग्णालयात उपचार सुरू असताना चोरटा मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अजगर अली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चेंबूर तसेच लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सरला काळे यांनी दिली आहे. याप्रकरणी मारहाणीत मयत झालेल्या चोरट्याच्या पत्नीने कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून नारायण दळवी तसेच तुषार दळवी या दोघांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या चोरट्याच्या विरोधात दळवी कुटुंबाने घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा तपासही पोलीस करीत आहेत.