ठाणे : अजित पवार यांनी आमचे घड्याळ मनगटावरुन पाकिटमारासारखे चोरले, अशी टीका माजी मंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर बुधवारी केली.
निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे टीकास्त्र सोडले. आमचा पक्ष, आमचं नाव हे शरद पवारच आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. आयोगाचा निर्णय हा दुटप्पी आणि संभ्रम निर्माण करणारा असल्याचे सांगत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि पक्षाचे चिन्ह कोणाचे या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये संघर्ष सुरु होता. मंगळवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्हही अजित पवार गटाला मिळाल्याने शरद पवार गटामध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यांनी अजित पवार गट व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे आम्हाला निवडणूक आयोगाने नाव दिले आहे, हेच नाव आम्हाला हवे होते, आणि तेच मिळाले, आणि यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-अलीबाबा चालीस चोर पार्टी’ कारण त्यांनी पाकीटमारासारखंच आमचं घड्याळ मनगटावरून चोरलं, असा टोला आव्हाड यांनी अजित पवार गटाला लगावला.
त्यांनी कशावरही दावा करू द्या, पण महाराष्ट्राच्या जनतेला सर्व माहित आहे. ज्या पद्धतीने तुम्ही शरद पवार यांना छळले आहे, त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागतील, असेही ते म्हणाले. हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते? पक्ष कोणी मोठा केला? हे सर्वांना माहित आहे. आता निवडणूक आयोग कठपुतळी असून धादांत खोटे बोलत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. काल एकजण बोलला आव्हाड घरात भांडणं लावतो, मात्र तुम्ही तुमच्या काकांना आणि बहिणींना किती त्रास दिला, हे सर्व परळीकरांना माहित आहे, असा टोलाही आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
शरद पवार यांना संपवण्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात काही करता आलं नसतं, हे त्यांना माहित होतं, आणि याच सगळ्याला त्यांच्याच घरातून मदत झाली, असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.