वाहनतळाचे रुग्णालय होणार; सुविधा इमारत ‘खासगी’त जाणार

ठाणे : ठाणेकरांना गाड्या ठेवण्यासाठी वाहनळांची समस्या निर्माण झाली असताना सुमारे ५०० ते हजार गाड्या उभ्या राहतील असे तयार करण्यात आलेले पार्किंग प्लाझाचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचा घाट घातला जात आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाखाच्या पुढे गेली आहे. बहुतेक कुटुंबातील सदस्याकडे दुचाकी किंवा चारचाकी गाडी आहे. जुन्या ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे गाडी ठेवण्याची सोय नाही. ठाण्यात तयार झालेल्या मॉल संस्कृती आणि रुग्णालय परिसरात नागरिकांना गाड्या ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. सेवा रस्त्यावर गाड्या ठेवल्या जात असल्याने ठाणेकरांना पार्किंगची उत्तम सोय व्हावी म्हणून ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जैस्वाल यांनी ज्युपिटर रुग्णालयाजवळ कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या बदल्यात सात मजली पार्किंगची व्यवस्था केली होती.
कोरोनाच्या काळात तेथे तात्पुरते ११०० बेडचे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले होते. सद्या हे केंद्र बंद आहे. पार्किंगची उभारणी करताना वापरात बदल देखील करण्यात आला होता. विवियाना मॉल आणि ज्युपिटर रुग्णालयात येणारे रूग्ण त्यांचे नातेवाईक तसेच या परिसरात असलेल्या अनेक आस्थापना, तेथे येणारे कर्मचारी यांच्यासाठी पार्किंगची सोय करण्यात आली होती. या भागात एकही महापालिकेचे पार्किंग नव्हते, त्यामुळे तेथे नागरिकांची उत्तम सोय होणार होती, परंतु नुकताच ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्याठिकाणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याबाबत महापालिका विचार करत असल्याचे जाहीर केले.
कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाकरिता येथे साहित्य खरेदी केले होते. त्याचा उपयोग व्हावा म्हणून याचे रुग्णालयात रूपांतरकरण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते, परंतु ठाणेकरांना मात्र पार्किंगकरिता जागा पाहिजे. त्यांनी त्या साहित्याचा वापर कळवा रुग्णालयातील क्षमता वाढविण्यासाठी करावा अशी सूचना करण्यात येत आहे.
ठाणेकरांचे मोक्याचे भूखंड आणि सुविधा इमारती खासगी संस्थांच्या घशात घातल्या जात आहेत. तिच स्थिती या पार्किंग प्लाझाची होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.