ठाण्यात मतविभाजनामुळे आठ उमेदवार पडले
ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडल्याचा फटका उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला देखिल बसला. मत विभागणीचा फटका बसल्याने त्यांचे किमान आठ नगरसेवक थोडक्या मतांनी पराभूत झाल्याने काँग्रेसचे महापालिकेतील अस्तित्व संपले तर उबाठाची एक जागा कशीबशी आली.
महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांची युती झाली. त्याचा त्यांना फायदा झाला, परंतु काँग्रेस, उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील आघाडीची बोलणी सुरु असताना काँग्रेसला कमी जागा मिळाल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली. त्यांनी स्वबळावर उमेदवार उभे केले याचा फटका काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांना देखिल बसला. चव्हाण हे प्रभाग ७ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना 8759 मते मिळाली होती तर उबाठाचे दीपक सिंग यांना 5288 मते मिळाली होती. या दोघांच्या मतांची बेरीज 14,047 इतकी होत असून विजयी उमेदवार वैभव कदम यांना 11,611 मते मिळाली. आघाडी असती तर श्री. चव्हाण हे तब्बल चार हजार मतांनी विजयी झाले असते. तशीच परिस्थिती प्रभाग क्र 7(ब) महिलाकरिता राखीव असलेल्या प्रभागात दिसून आली. मनसेच्या स्वप्नाली पाचंगे यांना 7069, काँग्रेसच्या नम्रता जाधव यांना 6719 मते मिळाली होती तर सेनेच्या विजयी उमेदवार कल्पना पाटील यांना 12377 मते मिळाली आहेत. मनसे आणि काँग्रेसची मते सुमारे एक हजाराने जास्त आहे. प्रभाग 11 येथे उबाठाच्या महेश्वरी तरे यांना 10,550 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे दीपक जाधव यांना 11,674 मते मिळाली. काँग्रेस उमेदवार हेमंत इंगळे यांनी 1836 मते मिळविल्याने श्रीमती तरे यांचा पराभव झाला. प्रभाग 3 येथे उबाठाचे जयनाथ पुर्णेकर यांना 7573 मते मिळाली. शिवसेनेचे विजयी उमेदवार विक्रांत वायचळ यांना 7731 मते मिळाली असून काँग्रेस उमेदवार अमन बारवल यांना 1733 मते मिळाली. त्यामुळे मत विभाजन होऊन वायचळ यांना निसटता विजय मिळाला.
काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली असती तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना फटका बसला असता. मनसे आणि काँग्रेसने देखिल महापालिकेत खाते खोलले असते. त्याचबरोबर उबाठाची ताकद देखिल वाढली असती, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.