पाणी जपून वापरण्याचे आयुक्तांचे आवाहन
नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, १०३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.
संभाव्य एल निनो वादळाच्या शक्यतेमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत मोरबे धरणाच्या पाणी साठ्याबद्दल आयुक्त शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्राला मोरबे आणि बारवी धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर असून सध्या ८२.५५७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी एक महिन्याचा राखीव साठा वगळल्यानंतर प्रत्यक्ष वापरासाठी सुमारे २७ टक्के पाणी उपलब्ध आहे. सध्याच्या वापराच्या दरानुसार हा साठा ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत, म्हणजेच सुमारे १०३ दिवस पुरेल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पर्जन्यमान सरासरीच्या ९२ ते ९४ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. २००७ ते २०२५ या कालावधीत मोरबे परिसरात सरासरी ३६१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी साधारण ३५०० ते ३६०० मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र यंदा सुमारे ३३०० मिमी पावसाचा अंदाज असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सध्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसला, तरी परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. पुढील वर्षीही पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, वाहन धुण्यासाठी पाणी वापरणे टाळावे, तसेच पाणी साठवण टाक्या ओसंडून वाहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
दरम्यान, पाणी कपातीचा निर्णय तूर्तास तरी घेण्यात आला नसला तरी येत्या १०-१५ दिवसांत पर्जन्यमान आणि एकूण परिस्थतीचा आढावा घेऊन त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे आयुक्त डॉ. केलीस शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.