३० फूट उंचीवरून पडून कामगार जागीच ठार

तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असताना झाला अपघात

ठाणे: ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मेट्रोचे काम सुरु असताना जवळपास ३० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. तर घटनास्थळी असलेल्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांवरही या प्रकारामुळे नागरिक संतापले आहेत. या अपघातानंतर मात्र पूर्वद्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

घाटकोपर ते वडवली हा मेट्रो-४ मार्ग ठाणे शहरातून जात असून ठाण्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तीन हात नाका परिसरातून मेट्रोला प्रवेश देण्यात आला आहे. ठाण्यात मेट्रोचे कामही प्रगतीपथावर आहे. तीन हात नाका परिसरात मेट्रोचे पहिले स्थानक असून या ठिकाणी मोठे खांब उभारण्यात आले आहेत. हे काम सुरु असताना ३० फूट उंचावरून पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कामगार रस्त्यावर पडल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात होऊन लवकर कोणीच न आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

ठाण्यात एलबीएस मार्ग, तीन हात नाका, पूर्व दृतगती महामार्ग ते थेट घोडबंदर रोडवर मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रो स्थानक उभारणे, गर्डर बसवणे, खांबांची उभारणी या कामादरम्यान अपघात घडण्याची मालिका कायम आहे. तीन हात नाक्याजवळ मर्फी आरटीओ कार्यालयासमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरु असून या ठिकाणी उंचावरून कोसळल्याने कामगाराचा मृत्यू झाला. या अपघाताने कामगारांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामगार खाली कोसळताच या ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी उसळली. तसेच पूर्व दृतगती महामार्गाशेजारीच ही घटना घडल्याने मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने खोळंबली होती. या वाहनांच्या रांगा कोपरी उड्डाणपुलापर्यंत गेल्या होत्या.

सहा महिन्यांपूर्वी मेट्रोच्या कामादरम्यान तीन हात नाका येथे १५ ते २० फुट उंचावरून एक लोखंडी सळई रस्त्यावरुन जाणाऱ्या कारमध्ये
आरपार उभी शिरली होती. वाहन चालकापासून अवघ्या काही इंच अंतरावर ही सळई पडल्याने वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव तेव्हा थोडक्यात बचावला होता. मात्र आजच्या घटनेमुळे मेट्रोच्या कामादरम्यान होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.