अनधिकृत बांधकामांचा ठपका
ठाणे : शीळ भागातील अनधिकृत इमारतींना संरक्षण दिल्याचा ठपका ठेऊन दिवा-शीळ प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांना अखेर महापालिका प्रशासनाने निलंबित केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. आणखी काही जणांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.
दिवा-शीळ प्रभाग समिती हद्दीत शीळ येथे हरित पट्ट्यावर अनधिकृत १७ इमारती उभारण्यात आल्या होत्या. या इमारतींच्या जमिन मालक सुभद्रा टकले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने मागिल दहा दिवस या अनधिकृत इमारतीच्या विरोधात महापालिका अतिक्रमण विभागामार्फत कडक कारवाई सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखिल या अनधिकृत इमारतींच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देत महापालिका प्रशासनावर देखिल ताशेरे ओढले होते. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी लावण्याचे देखिल आदेश दिले होते. ही चौकशी देखिल सुरु झाली आहे.
महापालिका प्रशासनाच्या डोळ्यासमोर इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असताना त्या भागातील तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांची बांधकामे थांबवण्याची जबाबदारी असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन अखेर आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी फारुख शेख यांना निलंबित करण्याचे आदेश दिले, त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उशिरा का होईना महापालिका आयुक्त श्री.राव यांनी कठोर भूमिका घेतल्याबद्दल ठाणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम राजकीय दबावाला बळी पडून थांबवू नये, अशी मागणी देखिल ठाणेकर करत आहेत.
शासनाच्या अधिकाऱ्यावर मेहरबानी?
दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार अक्षय गुडदे, आणि प्रितम पाटील या दोन शासनाच्या अधिकाऱ्यांकडे असताना या १७ इमारतींच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यांनी दिलेल्या आशिर्वादामुळेच या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या होत्या, परंतु यात स्थानिक अधिकाऱ्याचा मात्र बळी गेला, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु झाली आहे. याच प्रकरणात फारुख शेख पूर्वी निलंबित झाले होते. चौकशीमध्ये ते निर्दोष सुटल्याचे देखिल अनेकांनी सांगितले.