ठाकरे गटाला पालघरमध्ये घरघर

ठाणे: पालघर जिल्ह्यात ठाकरे गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी गुरुवारी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदाश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व पदाधिकार्‍यांचे व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आगामी जिल्हापरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत भगवाच फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा पाटील, जमीला सय्यद, प्रीती मोरे, ललिता कोळी, जितेंद्र दळवी, भावेश धर्ममेहेर, मंगेश बात्रा, माजी सरपंच विकास पाटील, विवेक घरत, विनीत पाटील, कामिनी पाटील, जयेश कोरे या पदाधिकार्‍यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर डहाणू तालुक्यातील माजी उपसभापती पिंटू गहला, काजल राबड, जयश्री करामोडा, सुरेंद्र राबड, पंचायत सदस्य नरहरी दायत नेहा धर्मामेहेर, कृती मंत्री, कौशिक निकोले आणि इतर सदस्यांचा समावेश होता.

शिवसेनेने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पालघर जिल्ह्याने कायमच शिवसेनेला साथ दिली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पालघर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आज पालघरहून इथे यायला तुमच्यातील अनेकांना मोठी अडचण आली असली तरीही मुंबईतील कोस्टल रोड आपण मीरा भाईंदर, वसई विरार आणि त्यानंतर पालघरपर्यंत वाढवणार आहोत त्यामुळे भविष्यात तुम्हाला ट्रफिकमध्ये तासनतास अडकून पडावे लागणार नाही असे सांगितले. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काम आणि विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी पूर्ण जोमाने कामाला लागावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.