नाशिक : भारताला उत्तम तंत्रज्ञानाची व अत्याधुनिक उपचारांची आवश्यकता आहे. उपचार परवडणारे असलेच पाहिजेत पण त्यात एक्सलन्स अधिक महत्वाचा भाग आहे. अत्याधुनिक उपचारांचे एसएमबीटी मॉडेल देशात आदर्श बनेल असे प्रतिपादन प्रख्यात शास्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने साकारल्या जाणाऱ्या विशेष सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आणि एसएमबीटी केअर प्लस, एसएमबीटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एसएमबीटी टेलीमेडिसीन, एसएमबीटी ई-कॅम्पस या विविध सेवा उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. एस. डी. बनवली, डॉ. पंकज चतुर्वेदी, डॉ. राहुल पुरवार, एसएमबीटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, आशिमा मित्तल, डॉ. जयश्री थोरात, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये टाटा मेमोरियल सेंटरच्या तांत्रिक मार्गदर्शनाने २०० बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल लवकरच साकारले जाणार आहे.
रुग्णालय उत्तम दर्जाचे असले की ते महाग असते असे म्हटले जाते. मात्र, एसएमबीटी वेगळे हॉस्पिटल आहे, कमीत कमी दरात गुणवत्तापूर्ण उपचारामुळे एसएमबीटी हॉस्पिटल भारतासाठी नव्हे तर जगासाठी उत्तम उदाहरण असल्याचेही डॉ. माशेलकर म्हणाले. एसएमबीटी कॅम्पसमध्ये देशातील दर्जेदार उपचार होत आहेत याचा अभिमान आहे. एसएमबीटी केवळ हॉस्पिटल नसून १० ते १२ हजार लोकसंख्येचे गाव आहे. एसएमबीटीमुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे, असे आमदार थोरात म्हणाले. याप्रसंगी, माजी विधानसभा सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह डॉ. जयश्री थोरात यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
प्रारंभी, एसएमबीटी केअर प्लस म्हणजेच २०० बेड्सचे सुसज्ज असे स्पेशल रूमच्या विंगचे डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर याच विंग मध्ये असलेल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे उद्घाटन कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. नव्याने बांधकाम होणाऱ्या एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटचा दिमाखात भूमिपूजन सोहळा याठिकाणी पार पडला. एसएमबीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर टेली हेल्थ आणि ई-कॅम्पसचे ऑनलाईन स्वरुपात उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसएमबीटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे यांनी केले.