ठाणे: उन्हापासुन नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी महापालिकेने महिन्याभरासाठी नऊ सिग्नल चौकांमध्ये हरित आच्छादने उभारली होती. याचा लाभ वाहनचालकांना किती झाला, हे कळण्यास मार्ग नसला तरी यापोटी ठाणे महापालिकेला तंगीच्या दिवसांत ३२ लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागल्याचे समोर आले आहे.
उन्हाळ्यात ठाणे शहरात उष्णतेचा पारा चाळीशीपार गेला होता. त्यामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाही लाही होत होती. अशात शहरातील अनेक रस्ते आणि चौकांमध्ये ६० सेकंदांपेक्षा अधिक कालावधीचे सिग्नल आहेत. या सिग्नलवर भर उन्हाळयात वाहनचालकांना तिष्ठत उभे रहावे लागत होते. त्यांना एक मिनिट का होईना, सावली मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने १० एप्रिल ते १५ मे या कालावधीत शहरातील मुख्य रस्त्यावरील सिम्नलवर नऊ ठिकाणी हरित आच्छादने उभारली होती.
आयुक्तांच्या मान्यतेने अत्यावश्यक बाब म्हणून तीनहात नाका सिग्नल व खोपट सिग्नल येथे दोन, तर अल्मेडा चौक आणि नितीन कंपनी अशा नऊ ठिकाणी हरित आच्छादनांची व्यवस्था करण्यासाठी पालिकेने ठेकेदाराची नियुक्ती केली होती.
ठेकेदाराने हिरव्या रंगाच्या कापडाचे आच्छादन टाकल्यानंतर वाहनचालकांना मिनिटभर सावली मिळत होती, परंतु उन्हापासून किती सुटका झाली हे कळण्यास मार्ग नसला तरी या कामापोटी ठेकेदाराला ३२ लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागली आहे.