समृद्धीला जोडणारा रस्ता युद्धपातळीवर होणार

शहापूरच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

शहापूर: तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळले असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे वन मंत्री व ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या समवेत शहापूर तालुक्यातील विविध समस्या संदर्भात माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने शहापूर-सापगाव-मुरबाड महामार्ग, शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणा, भावली पाणी योजना आदी समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदी समस्या सोडविण्याबाबत निवेदन देण्यात आले.

शहापूर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय असून रूग्णालयातील डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रिक्त पदांमुळे गोरगरीब नागरीकांना तपासण्या आणि उपचारासाठी खाजगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून ही खर्चिक आणि खेदाची बाब आहे. रूग्णालयासाठी मंजूर असलेली प्रमुख पदे, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, सी.टी. स्कॅन ऑपरेटर वारंवार रिक्त असल्याने उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरीकांची प्रचंड गैरसोय होत असते. या उपजिल्हा रूग्णालयासाठी प्रशस्त इमारती उपलब्ध असून देखिल इमारतीमधे व आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तालुक्यातील बराचसा भाग मुंबई-आग्रा महामार्गालगत असून महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात. अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार होणे गरजेचे असूनही ग्रामिण भागातील किंवा अपघातग्रस्तांना ठाणे, मुंबई येथे उपचारासाठी जावे लागते. हे त्रासदायक असुन खर्चिक देखील आहे. ट्रामा केअर सेंटर शहापूरमध्ये सुरू झाल्यास रूग्णांची अपघातग्रस्त रूग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचविणे शक्य होईल. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

समृदी महामार्गाचे लोकार्पण झाले असून नागपूर ते आमनेपर्यंतच्या रस्त्यापर्यंत वेगाने प्रवास होत आहे. या महामार्गावरून शहापूर शहरातील नागरिकांसाठी खुटघर येथे इंटरचेंज ठेवण्यात आला आहे. शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग ५४८ अ चे काम एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे. मात्र खुटघर ते शहापूर शहरापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर या मार्गावरील भातसा नदी व आवरे नदीवरील पुल नादुरूस्त झाले आहेत. शहापूर तालुक्यातील नागरिकांकडून खुटघर ते शहापूर रस्त्याचे काम वेगाने करण्यासाठी मागणी केली जात आहे. वाढती रहदारी व वहातुक लक्षात घेता नविन प्रस्तावित करण्यात आलेला रस्ता तात्काळ करण्यात यावा. तालुक्यातील सर्वात व्यस्त असणाऱ्या रस्त्याचे काम सुस्थितत होण्यास विलंब होत असल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. दरम्यान समृध्दी महामार्ग खुटघर इंटरचेंज ते शहापूर रस्ता तत्काळ नव्याने करण्याची मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक केल्यास आगामी काळात त्यांच्या पक्षाला राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.