भातसा नदीच्या उपनदीकडे होतेय दुर्लक्ष
पडघा: भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या पडघा येथील संपुर्ण कुंभेरी नदीचे पात्र जलपर्णीच्या विळख्यात सापडले असून पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने पडघा परिसरातून चिंता व्यक्त केली जात आहे. कुंभेरी नदी ही भातसा नदीची उपनदी समजली जाते.
अनेक गावांच्या हद्दीतून ही नदी वाहत असून परीसरातील नागरीकांसाठी मुख्य जलस्रोत आहे. अनेक गांवाची पाणीपुरवठा योजना या नदीच्या पाण्यावर अवलंबून असून अनेक नागरीक या नदीच्या पाण्यावर भाजीपाला पिकवून तो विकून व परीसरातील आदीवासी बांधव या नदीवर मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र बारमाही वाहणाऱ्या या नदीच्या पाण्यावर सगळीकडे जलपर्णी वाढल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. तर या नदीकिनारी प्रसिध्द कुंभेरेश्वर महादेव मंदीर असून शिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा या ठिकाणी भरत असल्याने ही नदी शिवभक्तांचे श्रध्दास्थान आहे. तसेच पडघा ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करुन पथदिव्यांची व्यवस्था करुन कुंभेरी नदीवर श्राद्ध व गणपती विसर्जन घाट बनवला आहे मात्र जलपर्णी सर्व नदीपात्रात पसरल्याने नागरीकांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. तर गणपती विसर्जन कसे करायचे असे प्रश्न नागरीक विचारत आहेत. नदी पात्रात सोडण्यात येणारे दूषित पाणी रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
जलपर्णीमुळे उन्हाळ्यात नदीपात्र आटण्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे मत असून संबंधित शासकीय विभागाने जलपर्णी काढुन थांबलेले नदीतील पाणी वाहते करण्याची मागणी नांगरीकानी केली आहे. नदीच्या दुरावस्थेकडे जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, लोकप्रतिनिधी या सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कापड युनिट, तबेला, फॉर्म हाऊसचे सांडपाणी कुंभेरी नदी पात्रात मिसळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तहसीलदार यांनी जागेवर पाहणी केली असून अजूनपर्यंत कोणतीच कारवाई अधिकाऱ्यांनी केली नाही, असे जलनायक डॉ. स्नेहल दोंदे यांनी सांगितले.