महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची माहिती
ठाणे: गावदेवी भाजी मंडईला लागलेल्या भीषण आगीमुळे बाधित झालेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन
१ जूनपर्यंत पुनर्वसन पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्ष पाहणीनंतर कामाची व्याप्ती मोठी असल्याने हे पुनर्वसन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे.
गुरुवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मंगळवारी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह गावदेवी भाजी मंडईची पाहणी केली. यावेळी मंडईतील जळालेल्या भागांची, साफसफाईची आणि सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची माहिती त्यांनी घेतली.
पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना पिंपळोलकर म्हणाल्या, की आगीमुळे मंडईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला १ जूनपर्यंत गाळेधारकांना पुनर्वसित करण्याचा प्रयत्न होता; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता कामाचा आवाका अधिक असल्याचे समोर आले आहे. सर्व गाळे सुरक्षित आणि सुस्थितीत करूनच गाळेधारकांना ताबा देण्यात येईल. सध्या मंडईतील ढिगारा हटविण्याचे तसेच स्थापत्यदृष्ट्या आवश्यक दुरुस्तीचे काम सुरू आहे. महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने साफसफाई आणि पुनर्बांधणीचे काम करत असून सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंडईतील कामकाज सुरू असताना स्थानिक नगरसेवकांनी नियमित पाहणी करून प्रशासनाला मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
महापौरांनी यावेळी मंडईच्या पहिल्या मजल्यावरील नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाचीही पाहणी केली. हे कार्यालय पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या दुर्घटनेत आग विझवताना शहीद झालेल्या अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे यांच्या कुटुंबीयांची महापौरांनी भेट घेतली. त्यांच्या पत्नी माधुरी शिंदे आणि आई जयश्री शिंदे यांना महापालिकेतर्फे १० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत देण्यात आली. आगीत जखमी झालेल्या अग्निशमन दलातील समीर जाधव, सुजीत पष्टे आणि प्रशांत मुल्ल्या यांच्या घरी जाऊन महापौरांनी त्यांची विचारपूस केली. तिघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, संजय वाघुले, सुनेश जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.