लोकार्पण सोहळा निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉल डावलला!

नगरविकास विभागाने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना मागितला खुलासा
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका क्रिडा संकुल व सभागृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेबाबत राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) न पाळल्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास विभागाने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना खुलासा करण्याबाबत बजावले आहे.
भाईंदर पश्चिमेला साठ फुटी रस्त्यावर बांधकाम केलेल्या क्रिडा संकूल व सभागृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांच्या नावाखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव छापले होते. एवढेच नव्हे तर निमंत्रण पत्रिका मीरा-भाईंदर महापालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आली होती. बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या महापालिका क्रिडा संकुल व सभागृह इमारत सोहळ्याची दखल घेऊन निमंत्रण पत्रिकेतील शासकीय प्रोटोकॉल न पाळल्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी नगरविकास विभागास अवगत केले. याप्रकरणी दखल घेऊन नगरविकास विभागाचे अवरसचिव डॉ. रविंद्र भराटे यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना पत्र पाठवून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.