कोलशेतमधील प्रदूषणकारी दगड कटाई प्रकल्प अखेर बंद

ठाणे: विविध विकासकामांमुळे घोडबंदर परिसरात हवा प्रदूषण वाढून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला असताना रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा कोलशेत येथील दगड कटाई प्रकल्प अखेर बंद करण्यात आला आहे.

कोलशेत रस्त्यावरील एका मोठ्या निवासी संकुलामध्ये हमरस्त्यालगत उघड्यावर संगमरवर आणि इतर दगड कापण्याचे व घासण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे, या प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून येथे नागरिक वास्तव्यास आले आहेत. तरीही दररोज सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी आणि वायू प्रदूषण होत होते. हवेत मिसळणाऱ्या सिलिका धुळीमुळे रहिवासी, कामगार आणि वाटसरूंच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

ठाणे महापालिकेने २१ मे रोजी स्थळपाहणी केली. त्यात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच बीपीएमसी कायद्यानुसार ५० हजार रुपयांचा दंड ठोठावत सात दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास ‘ओसी’ रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला. तरीही संबंधित प्रकल्पातील काम सुरूच राहिल्याने तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रशासन सक्रिय झाले आणि अखेर हा प्रकल्प बंद करण्यात आला.

तज्ज्ञांच्या मते, उघड्यावर दगड कापल्याने निर्माण होणारी सूक्ष्म सिलिका धूळ अत्यंत घातक असते. दीर्घकाळ संपर्क आल्यास कामगारांना सिलिकोसिस, क्षयरोग आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींमध्ये दम लागणे, खोकला आणि अस्थमासारख्या समस्या वाढू शकतात. असे असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग कारवाई करत नसल्याचा आरोप होत आहे.