ठाणे : तिसरा नवीन पुल खुला झाल्यानंतर जुन्या कळवा उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला ठाणे महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. या पुलावरील नवी मुंबईकडून ठाण्याकडे येण्यासाठी एकेरी मार्गिकाच सुरु करण्यात येणार आहे. या बदलामुळे वाहतुकीवरील भार आणखी कमी होईल, असा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
सर्वात पहिला ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्यानंतर एकाच पुलावर वाहतुकीचा मोठा भार पडत होता. परिणामी या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तिसऱ्या नव्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. या तिसऱ्या उड्डाणपुलाच्या पाच मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या असून यामुळे काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडीचा भार हलका झाला आहे. यानंतर आता जुन्या कळवा उड्डाणपुलाच्या दुरुस्तीलाही ठाणे महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आलेली आहे. या पुलावर डांबरीकरणाऐवजी पेव्हर ब्लाॅकचे बांधकाम केले होते. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी या पुलावरील पेव्हर ब्लाॅक बाहेर निघून खड्डे पडत होते. या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम कळवा, विटावा, दिघा, खारीगाव, सिडको, कोर्टनाका, साकेत, राबोडी या भागांवर होत होता. त्यामुळे जुन्या कळवा पुलाचे पेव्हर ब्लाॅक काढून मास्टिक पद्धतीने डांबरीकरणाचा निर्णय घेतला होता. त्या कामास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. सुमारे दीड महिन्यात पुलाच्या दोन्ही दिशेकडील पेव्हर ब्लाॅक टप्प्याटप्प्याने काढले जाणार असून तिथे डांबरीकरण केले जाणार आहे.
हे काम पूर्ण झाल्यास नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी ही मार्गिका एकेरी पद्धतीने सुरू होणार आहे. त्यामुळे कळवा, विटावा भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्ती होईल असा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.