अंबरनाथ: महामार्गालगत असलेल्या एका शाळेच्या आवारामध्ये वापरात नसलेले जुने विजेचे दोन टॉवर (मनोरे) उद्या शुक्रवारी पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याण-बदलापूर महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास बंद ठेवावी अथवा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यासंदर्भात अंबरनाथ वाहतूक पोलिसांशी उल्हासनगर महावितरणतर्फे पत्रव्यव्हार करण्यात आला आहे.
कल्याण-बदलापूर महामार्गावरील अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील महात्मा गांधी विद्यालयाच्या आवारात सुमारे ३५ ते ४० वर्षे जुन्या मनोऱ्यावर महावितरण (पूर्वीचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) अतीउच्च दाब वाहिनी अस्तित्वात आहे. त्या विद्युत वाहिनीतून कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा केला जात नाही. जुनी आणि वापरात नसल्याने मनोरा आणि विद्युत वाहिनी पूर्णपणे गंजून गेली आहे. तसेच जुन्या विद्युत वाहिनीच्या खालून मध्य रेल्वेची ठाकुर्ली आणि लोणावळापर्यंत जाणारी अतिउच्च वाहिनी जुन्या झालेल्या उच्चदाब वाहिनीत जाते. मध्य रेल्वेलाही त्यांचा अति संवेदनशील भागाचा विद्युत पुरवठा कमीत कमी कालावधीकरिता बंद ठेवावा लागणार आहे. भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी दोन मनोरे पाडण्याचा निर्णय महावितरणतर्फे घेण्यात आला आहे.
या कामासाठी महावितरण कंपनीने उद्या शुक्रवारी २४ नोव्हेम्बर रोजी मध्य रेल्वे आणि महात्मा गांधी यांच्या सहकार्याने जुनी आणि विद्युत वाहिनी मनोऱ्यासह काढण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनेही त्यांची अति उच्च दाब वाहिनी उद्या १२. ३० ते दुपारी तीनपर्यंत बंद करण्याचे निवेदन महावितरणला दिले आहे.
या कामामुळे उद्या शुक्रवारी दुपारी १२.३० ते तीनमध्ये कल्याण-बदलापूर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी अथवा पर्यायी मार्गाने वळवण्यात यावी याबाबत अंबरनाथ वाहतूक विभागाच्या पोलिसांना उल्हासनगर विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्यावतीने पत्र देण्यात आले आहे.