मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या गेली १३७ कोटींवर

मुंबई: मध्य रेल्वेतून दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करत असून त्यानुसार जानेवारी २०२६ मध्ये १२.७ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर, मध्य रेल्वेच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून एप्रिल ते जानेवारीदरम्यान सुमारे १३७ कोटी प्रवाशांनी प्रवास केला.

मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात (जानेवारी २०२६ पर्यंत) प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ झाल्याची नोंद झाली आहे. ज्यामध्ये लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा या दोन्ही विभागांमध्ये स्थिर वाढ नोंदवली आहे. मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण १३७ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षी याच कालावधीत १३४ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. यावर्षी सुमारे १.८६ टक्के अधिक प्रवाशांनी प्रवास केला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये लोकलमधून १२० कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर, गेल्यावर्षी ११८ प्रवाशांनी प्रवास केला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मेल/एक्सप्रेस/पॅसेंजर आणि इतर उपनगरीय गाड्यांमधून १७ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर, गेल्यावर्षी १६ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

जानेवारी २०२६ मध्ये मध्य रेल्वेतून १४ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी १२ कोटीहून अधिक प्रवाशांनी लोकल आणि १.७ कोटी प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून प्रवाशांनी प्रवास केला. नेरुळ/बेलापूर-उरण विभागात अतिरिक्त सेवा सुरू केल्यानंतर आणि या मार्गावर तारघर आणि गव्हाण स्थानकांचे लोकार्पण केल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत काहीशी वाढ झाली.

हार्बर मार्गावर वातानुकूलित सेवा सुरू केल्याने १६ दिवसांच्या अल्पावधीत ६ लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला. यामधून आरामदायी आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेतील वाढीला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. सध्या, मध्य रेल्वेद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील वाढती मागणी लक्षात घेऊन ९४ वातानुकूलित लोकल सेवांसह १,८२० लोकल सेवा चालविण्यात येत आहेत.

हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी – पनवेलदरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या २६ जानेवारीपासून सुरू झाल्या. हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या १४ फेऱ्या रद्द करून त्या वेळेत १४ वातानुकूलित लोकल चालवण्यात सुरूवात झाली. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सध्या ८० वातानुकूलित लोकल धावत आहेत. हार्बर मार्गावर १४ वातानुकूलित लोकल फेऱ्यांची वाढ झाली असून मध्य रेल्वेवर एकूण ९४ वातानुकूलित लोकल धावत आहेत.