ठाण्यात अपघातांचे प्रमाण घटले

ठाणे: डिसेंबर २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये अपघातांमध्ये घट झाली असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सर्वाधिक अपघात होणाऱ्या ३१ ब्लॅकस्पॉटचे सर्वेक्षण केल्यानंतर रस्ते सुरक्षा अभियानात उपाययोजनांची सप्तसुत्री राबवण्याबरोबरच प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतुक शाखेच्या वायुवेग पथके संबंधित ठिकाणी तैनात केली. यामुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ठाणे आरटीओ कार्यालयात गुरुवारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १०० दिवस राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती हेमांगिनी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, यावेळी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओकडून सप्तसुत्री राबवून केलेल्या जनजागृती कार्यक्रमांचा आढावा घेतला. अपघातात भारतात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे, तो शेवटच्या क्रमांकावर कसा जाईल, यासाठी आरटीओ प्रयत्नशील असल्याचे सांगुन भविष्यात असे रस्ते सुरक्षा अभियान राबविण्याची वेळच येता नये, असे स्पष्ट केले. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने ठाणे वाहतुक पोलीस आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती गोळा केल्याचे सांगितले. यामध्ये अपघातांचे एकुण ३१ ब्लॅक स्पॉट आढळले असुन सायंकाळी ६ ते ९ आणि रात्रौ १२ ते पहाटे ३ या कालावधीत अपघात घडल्याचे समोर आले. यात सर्वाधिक अपघात दुचाकींचे आढळून आले.

डिसेंबर महिन्यात आरटीओचे वायुवेग पथक आणि वाहतुक पोलिसांचे पथक त्याठिकाणी तैनात करण्यात आले. त्यामुळे २०२३ च्या तुलनेत २०२४ च्या डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाली. अशी माहिती देऊन हेमांगिनी पाटील यांनी, अपघातग्रस्ताला मदत केल्यास चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागते हा गैरसमज करून न घेता गोल्डन अवर्समध्ये निर्धोकपणे अपघातग्रस्ताला मदत करून जीवनदुत बना.असे आवाहन नागरिकांना केले. दरम्यान यावेळी विजयकुमार कट्टी यांच्या ‘आजीची-रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.