नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर रात्री वाशीत पैशाने भरलेली एक गाडी पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तपासाअंती ती एक अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत चांगलाच रंग भरला असताना मतदारांना पैसे वाटपाचे आरोप होत आहेत. सोमवारी कोपरखैरणे प्रभाग ११मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून एकास मारहाण करण्यात आली. तर मंगळावारी सकाळी नेरूळ प्रभाग २४ मध्ये एका व्यक्तीला अडीच लाख रुपयांसह स्थानिकांनी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हवाली केले. ही घटना ताजी असतानाच वाशी सेक्टर ९ येथील नूर मस्जिदसमोर एक पैशाने भरलेली गाडी पकडल्याची बातमी पसरली. त्यानंतर वाशी पोलिस ठाण्यात खासदार नरेश म्हस्के व माजी महापौर सागर नाईक दाखल झाल्याने शंकेला अधिक वाव मिळाला. मात्र या गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात काहीही आढळून आले नाही. त्यामुळे पैशाने भरलेल्या गाडीची बातमी अफवा असल्याची माहिती वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेरकर यांनी दिली.