जेवणात तणनाशक टाकून आईनेच घेतले मुलींचे प्राण

सांभाळ करण्यास असमर्थ ठरल्यानेच टोकाचा निर्णय

शहापूर: तालुक्यातील अस्नोलीतील तीन सख्ख्या बहिणींचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने वेगळेच वळण घेतले असून जन्मदात्या आईनेच जेवणात तणनाशक घालून आपल्या लेकींची हत्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

शनिवारी उशिरा आईनेच आपण केलेल्या भयानक कृत्याची कबुली दिल्यानंतर किन्हवली पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. माहेरी अस्नोली येथे राहणाऱ्या तीनही मुलींना २१ जुलै रोजी अन्नातून विषबाधा झाल्याने शहापूर, नंतर कल्याण व पुढे मुंबई, एसएमबीटी येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान काव्या भेरे (१०), दिव्या भेरे (८) यांचा मुंबईतील नायर रुग्णालयात, तर गार्गी भेरे (५) हिचा एसएमबीटी रुग्णालय घोटी येथे मृत्यू झाला होता. याबाबत मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाणे व एसएमबीटी रुग्णालय यांच्या माहितीवरून २५ जुलै रोजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १४४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद किन्हवली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. परंतु याप्रकरणी पती संदीप भेरे याने पत्नी संध्या भेरे हिच्यावर संशय व्यक्त करत आपल्या तिन्ही मुलींच्याबाबतीत घातपात झाल्याची तक्रार दिल्यानंतर किन्हवली पोलिसांनी शनिवारी (दि.२६) संध्या भेरे हिस ताब्यात घेवून चौकशी केली. त्यानुसार आपण मुलींचा सांभाळ करण्यास समर्थ नसल्याने तिन्ही मुलींना जेवणात वरणासोबत तणनाशक देवून त्यांना ठार मारल्याची कबुली दिली.

पडघा येथे वेअर हाऊसला काम करणाऱ्या आई संध्याने स्वतः च्या पोटच्या मुलींना निघृणपणे मरणाच्या खाईत लोटल्याने मातेच्या नात्यालाच कलंक लावला आहे. किन्हवली पोलिसांनी सदर महिलेला अटक करत तिच्यावर कलम १०३(१) प्रमाणे शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली किन्हवली पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन खैरनार, महिला पोउनि मोहिनी कपोले,पो. उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर व इतर पोलीस कर्मचारी यांनी याप्रकरणी जलद तपास करत विषबाधा प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.