बिटुमन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात
ठाणे : डोंबिवली आणि भिवंडीला जोडणारा मोठागाव-माणकोली पूल या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या पुलावर ‘बिटुमन’ टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर लेन मार्किंग व संबंधित कामे केली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मोठागाव-माणकोली पूल सुरू झाल्याने सध्याच्या दोन मार्गावरील वाहनांची वर्दळही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बहुधा, पुढील महिन्यात उद्घाटन सोहळा होण्याची शक्यता आहे. एकदा उद्घाटन झाल्यानंतर, पूल वाहनांना नेहमीच्या प्रवासाकरीता खुला होण्याची शक्यता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिका-याने व्यक्त केली.
प्रवासाचा वेळ सध्याच्या एका तासावरून केवळ 15 मिनिटांपर्यंत कमी होईल. डोंबिवली ते भिवंडी तसेच ठाणे, मुंबईपर्यंत प्रवास करणा-या प्रवाशांना आणि शेकडो वाहन चालकांना दिलासा मिळेल. त्यांचा दररोजचा प्रवास उल्हास खाडीवरून जाणार आहेच शिवाय आणि एकूणच रस्त्याचे अंतरही कमी करणार आहे.
या नव्या मार्गावरील प्रवासाचे अंतर सुमारे 27 कि.मी कमी करण्याच्या दृष्टीने पुलाची रचना करण्यात आली आहे. सध्या ठाणे किंवा मुंबईकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला डोंबिवली मार्गे शिळफाटा ते मुंब्रा ते ठाणे आणि नंतर मुलुंडनंतरचा आहे. पर्यायी मार्ग डोंबिवली ते कल्याण ते भिवंडी बायपास आणि नंतर मुंबईच्या दिशेने जाणारा राष्ट्रीय महामार्ग 3 आहे. तत्पूर्वी, एमएमआरडीएने एप्रिल 2023 ची पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली होती. या प्रकल्पावरील बांधकामाचे काम फेब्रुवारी 2017 मध्ये होणार होते. मात्र सन 2019 च्या मध्यापर्यंत नियोजित मुदतीसह परत सुरू झाले आहे.
प्राधिकरणाच्या अधिका-याने सांगितले की, या प्रकल्पाच्या माणकोली बाजूला भूसंपादनाशी संबंधित आव्हानांमुळे हा विलंब झाला. सन 2017 मध्ये नियोजन आणि निविदा प्रक्रियेच्या दरम्यान, प्रकल्पाची किंमत 223 कोटी रुपये एवढी होती. विविध कामांच्या अंमलबजावणीत विलंब झाल्यामुळे, खर्चाचे ‘शेपुट’देखील वाढत गेले आहे.
मोठागाव पूल कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याशी जोडणार?
याशिवाय, कल्याणमधील मोठागाव पूल दुर्गाडीशी (गोविंदवाडी येथील) जोडण्याकरीता कल्याण रिंगरोडचा काही भाग बांधण्याचाही एमएमआरडीएचा विचार आहे. जोपर्यंत रिंगरोडचा हा भाग तयार होत नाही तोपर्यंत वाहनचालकांना दुर्गाडीपर्यंत जाण्यासाठी अरुंद दुपदरी रेतीबंदर पूल आणि 90 फूट रस्त्यांचा वापर सुरू ठेवावा लागणारच आहे.
5.86 किमींचा रस्ता प्रशस्त करण्यासाठी 425 कोटी रुपये खर्च
कल्याण रिंगरोडच्या एकूण 30.3 किमींपैकी 5.86 किमींचा रस्ता प्रशस्त करण्यासाठी या प्रकल्पासाठी 425 कोटी रुपये खर्च येईल, असा विकास प्राधिकरणाचा अंदाज आहे. हा नवीन रस्ता असून सध्याच्या रस्त्याच्या जागेचे रुंदीकरण होणार नाही. रस्त्याचा एक भाग स्टिल्ट्सवर असल्यामुळे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.