उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतही सेना भाजपत डाव-प्रतिडाव
ठाणे: मुंबईत सर्वाधिक नगरसेवक असताना भाजपला महापौर पदासाठी शिंदे गटाची गरज निर्माण झाली असून शिंदे गटाने भाजपला चांगलेच कात्रीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यासह उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाने महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदावरून शिंदे गटाला वेढा घालण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिकेत महायुतीला काठावर यश मिळाले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जागा जिंकूनही भाजपला आपला महापौर बनवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची मदत लागणार आहे. दरम्यान शिंदे गटाने आपले नगरसेवक नजरकैदेत ठेवून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा दबाव काढून टाकण्यासाठी आता ठाण्यातील भाजप कामाला लागली आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे ७५ नगरसेवक निवडून आले आहेत. बहूमतासाठी लागणारे ६६च्या संख्याबळापेक्षा नऊ नगरसेवक जास्तीचे शिंदे गटाकडे आहेत. अशावेळी आपल्या पदरात काय पडणार ही चिंता भाजपला सतावू लागली आहे.
मुंबईत खलबते सुरू असल्याने आणि जिल्ह्यातील इतर महापालिकांमध्ये भाजपला दुय्यम स्थान मिळत असल्याचे पाहत ठाण्यात भाजपने आता थेट दोन वर्षे महापौर पदाची मागणी केली आहे. भाजपचा शहरात ७४ टक्के रेट असून महायुतीत कमी जागा घेऊनही जास्तीचे नगरसेवक निवडून आणल्याकडे लक्ष वेधले आहे. दोन वर्षांसाठी महापौर पद द्या अन्यथा विरोधी बाकावर बसण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता असली तरी त्यांनी सावध भुमिका घेतली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवली असून सत्तेत दोन्ही पक्ष असावेत असे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र याविषयी अंतीम निर्णय वरिष्ठ नेते घेतील असेही ते म्हणाले आहे.
कल्याण-डोंबिवलीतही हाच गुंता रंगला आहे. कल्याण-डोंबिवलीत २०१७ प्रमाणेच शिवसेना-भाजपला यश मिळाले आहे. मात्र त्यावेळी हे दोन्ही पक्ष विरोधात लढले होते. तर आता महायुती म्हणून एकत्र आले होते. भाजपने येथे आपले सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून महापौर बसवण्याचे मनसुबे आखले होते. पण शिंदे सेनेने ते उधळून लावले. घोडेबाजारातही भाजपची सरशी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वरकरणी महायुतीचाच महापौर बसणार असे हे दोन्ही पक्ष बोलत असले तरी आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येथे खेळ अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे उल्हासनगरमध्ये भाजपने ३७ जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाला ३६ जागा मिळाल्या आहेत. मात्र सत्ता स्थापनेसाठी असलेली मॅजिक फिगर या दोघांकडे नाही. यामध्ये वंचित किंगमेकर ठरणार असून सध्यातरी त्यांचे पारडे शिंदे गटाकडे झुकल्याचे दिसते.
एकूणच मुंबईतील तिढ्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत महत्त्वाच्या पदावरून भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. मात्र लवकरच आरक्षण सोडत काढण्यात येणार असून दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.