नवी मुंबईत एकूण ९५६ अर्ज दाखल
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयाबाहेर मोठी गर्दी दिसून आली. एकुण वितरीत केलेल्या २९१७ अर्जांपैकी ९५६ जणांनी अर्ज भरले असून नेरूळ विभागात सर्वाधिक १६२ अर्ज दाखल झाले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका स्थापनेपासून ही सहावी सार्वत्रिक निवडणूक आहे. आतापर्यंत नवी मुंबईत एकल पद्धतीने निवडणुका पार पडल्या असून यंदा प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे. एकूण २८ प्रभागांतून १११ नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. ३० डिसेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.
निवडणुक लढण्यासाठी विविध राजकीय पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवार सज्ज होते. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज वितरीत झाले होते. अर्ज वितरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २९१७ अर्ज वितरीत करण्यात आले होते. त्यापैकी ९५६ जणांनी अर्ज दाखल केले असून नेरूळ विभागात चार प्रभागांसाठी एकूण १६२ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात कमी ८६ अर्ज दिघा विभागात दाखल करण्यात आले आहेत.
विभागनिहाय दाखल नामनिर्देशनपत्रे
बेलापूर: १३६, नेरूळ: १६२, वाशी: १०२, तुर्भे: १४५, कोपरखैरणे: १२३, घणसोली: ११३, ऐरोली: ८९, दिघा: ८६, एकूण: ९५६