बिबट्याला ठार मारून पंजे छाटले

शहापूर उपवनसंरक्षक विभागात शिकाऱ्यांचा हैदोस

शहापूर: तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रात छलिया शिकारी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बिबट्याला अज्ञात व्यक्तींनी क्रूरतेने ठार करून त्याच्या पायांचे पंजे शरीरापासून वेगळे करून लंपास केले आहेत. हा प्रकार सुसरवाडी गाव हद्दीतील कोरड्याठाक नाल्यात मंगळवारी उघडकीस आला. या घटनेमुळे वन्यप्राण्यांचे जतन आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाशाळा वनविभागातील सुसरवाडी शिवारातील बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती वनअधिकारी यांना मिळताच ते कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बिबट्या मृत अवस्थेत पडला असून त्याच्या पायाचे पंजे कापल्याचे दिसून आले. शिकारींनी बिबट्याला क्रूरतेने मारून असंवेदनशीलता दाखवली आहे. बिबट्यांच्या नख्या तसेच मिशांच्या केसाबाबत काही अंधश्रद्धा असल्याने बिबट्यांची शिकार केली जात असल्याचे बोलले जात असले तरी बिबट्याची शिकार झालीच कशी तसेच वनविभाग कर्मचारी गस्तीवर नव्हते का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करण्याची पुढे येत आहे. मृत बिबट्याची विल्हेवाट वनविभागाकडून करण्यात आली आहे. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचा उलगडा अंतिम शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल, अशी माहिती पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत वनविभागाकडून माहिती देण्यात आली नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याला इतर ठिकाणी ठार मारून नाल्यात टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

घटनेशी संबंधित वाशाला वनपरीक्षेत्र अधिकारी एकनाथ रोंगटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वन्यजीव संवर्धनासाठी गस्त वाढवणे, संवेदनशील भागांमध्ये कॅमेरा ट्रॅप्स बसवणे आणि जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.