ठाणे : विटावा खाडीत मातीचा भराव टाकून चाळी उभारण्याचा डाव कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी उलथवून टाकत आज मोठी कारवाई केली. त्यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त आहे.
मागील काही दिवस विटावा खाडीत मातीचा भराव टाकून त्यावर चाळी उभारण्यासाठी पायांचे बांधकाम करण्यात आले होते. या भरावामुळे खाडीत बॉटल नेक तयार झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह उलट फिरून विटावा गावात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिकांनी प्रभाग समितीकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबतचे वृत्तही ठाणेवैभवमध्ये प्रसिद्ध झाले होते.
याची दखल घेत सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी आज विटाव्यात कारवाईची मोहीम हाती घेतली. चाळी उभारण्यासाठी बांधण्यात आलेले पाया उखडण्यात आले. या कारवाईमुळे बांधकाम धारकांचे धाबे चांगलेच दणाणले.
चाळींच्या बांधकामांबरोबरच विटाव्यात इमारतींची बांधकामे सुरू आहेत. शांताराम नगर येथील शंकर मंदिराजवळ देखील उघडपणे बांधकाम सुरू आहे तर काही महिन्यांपूर्वी ज्या इमारतींवर कारवाई करण्यात आली होती, त्या इमारतींची बांधकामे देखील लपून छपून सुरू झाली आहेत. या बांधकामांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.