पुण्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागेवर विजयी
पुणे: अखेर चिंचवड मतदारसंघात भाजपचीच सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला.
चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे आव्हान होते. महाविकास आघाडीला या निवडणुकीत कलाटेंच्या बंडखोरीचा फटका बसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली. अश्विनी जगताप या 36 हजार 168 मतांच्या फरकाने विजयी झाल्या.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा खूप प्रयत्न झाला. पण अखेर महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध न करता आपला उमेदवार घोषित केला. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. पण उमेदवारीसाठी आग्रही असलेले राहुल कलाटे यांची नाराजी महाविकास आघाडीने ओढवून घेतली. अखेर भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या होत्या.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी मतदान केलं होतं.
रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय
पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.
रासनेंसमोर धंगेकरांचं तगडं आव्हान
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 50.06 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, 2 लाख 75 हजार 679 मतदारांपैकी 1 लाख 38 हजार 018 मतदारांनी मतदान केलं होतं. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले होते. मतमोजणीपूर्वीपासूनच राजकीय वर्तुळात भाजपच्या हातून पारंपारिक मतदारसंघ काँग्रेस हिसकावून घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.