युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत; २० टक्के हॉटेल बंद

मुंबई: अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. युद्धाचे परिणाम भारतासह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही दिसू लागले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20टक्के हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे.

अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे. गॅसचा तुटवडा मुंबईत आता जाणवण्यास सुरुवात झाल्याने मुंबईतील सद्यस्थितीत दहा ते वीस टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार (असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट) संघटनेकडून देण्यात आली आहे.

पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50टक्के हॉटेल बंद करण्याची वेळ आहार संघटनेवर येईल, असं संघटनेच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील विविध ठिकाणी हॉटेल्समध्ये गॅस पुरवठा कमी असल्याने आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅसचा पुरवठा आहे. त्यामुळे त्या हॉटेल बंद ठेवावे लागतील, असं असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंटकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातील लघुउद्योग कंपन्यांना बसणार आहे. युद्धामुळं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यातील व्यत्यय आणि एलपीजी पुरवठ्यातील निर्बंध लक्षात घेता, मंत्रालयाने तेल रिफायनरीजना अधिक एलपीजी उत्पादन करण्याचे आणि त्या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी साठी करण्याचे आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाने घरगुती एलपीजी पुरवठ्याला घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले असून, साठेबाजी/काळ्या बाजाराला रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी सुरू केला आहे. आयातित एलपीजी पासून होणाऱ्या नॉन-डोमेस्टिक पुरवठ्याला रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या आवश्यक नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे.