धबधब्यांमधून ओसंडणारा उत्साह डोळ्यांतून चुरचुरतो…!

डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

ठाणे: सध्या राज्यभरात पावसाचा जोर वाढलेला आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांतील पर्यटक मोठ्या संख्येने भटकंतीसाठी डोंगरदऱ्यांकडे वळत आहेत. मात्र भटकंती करताना डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका. पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचा धोका अधिक असून, भिजताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे नेत्रतज्ज्ञ म्हणतात.

शहापूर, मुरबाड, माथेरान, लोणावळा भिवपुरी, कसारा, वज्रेश्वरी, टिटवाळा आदी ठिकाणी निसर्गरम्य धबधब्यांनी पर्यटकांना वेड लावले आहे. मात्र, या निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना आरोग्याचे, विशेष करून डोळ्यांचे गंभीरतेने भान ठेवण्याची गरज आहे. डोळे हे शरीरातील सर्वात नाजूक आणि संवेदनशील अवयवांपैकी एक असून, पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे धबधब्याखाली उभे राहताना डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे नेत्र तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

धबधब्याचे पाणी किंवा पावसाचे साचलेले पाणी डोळ्यांत गेल्यास बॅक्टेरिया, विषाणू किंवा जंतूंचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना खाज, लालसरपणा, डोळे चुरचुरणे, पाणी येणे यासारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. काही वेळा हे लक्षण गंभीर आजारांचे संकेतही असू शकतात, अशी माहिती सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

पावसात भिजल्यानंतर डोळे स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसावेत, डोळ्यांत खाज येत असल्यास हाताने चोळू नये, धबधब्याखाली उभे राहताना डोळ्यांवर चष्मा किंवा रुमाल ठेवावा. कोणतीही जळजळ, सूज किंवा अस्वस्थता वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ.अंबाडेकर यांनी सांगितले.

सह्याद्रीतील सौंदर्य अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. पण त्यासाठी आरोग्याशी तडजोड करणे टाळावे. डोळ्यांप्रमाणेच त्वचा, पायांचे तळवे, पचनसंस्था यांचीही योग्य निगा राखणे गरजेचे असल्याचा सल्ला ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिला.