आषाढी अमावस्येचा उत्साह रविवारीच ओसंडला!

* मटण, चिकनसाठी रांगा
– मासळी बाजारही गजबजला

ठाणे: सण-उत्सव, व्रत वैकल्यांचा मास असलेला श्रावण २५ जुलैपासून सुरू होत असून श्रावण पाळणाऱ्या मांसाहारी खवय्यांना आजचा रविवार आणि येणारा बुधवार हे दोनच दिवस मिळाले आहेत. त्यामुळे आज रविवारी चिकन, मटणाच्या दुकानासमोर पहाटेपासून दुपारपर्यंत लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दुसरीकडे मासळी बाजारही गजबजला होता.

२५ जुलै रोजी श्रावण सुरू होत असल्याने मांसाहारी खवय्यांनी आणि तळीरामांनी गटारी साजरी करण्यासाठी आज रविवारी भल्या पहाटेपासूनच तयारी सुरू केली होती. चिकन, मटणाची दुकाने, मासळी बाजार खवय्यांनी गजबजलेला असताना वाइन शॉप देखील तळीरामांनी गजबजले होते. कुणाकडे कोंबडी वडे, आंबोळी मटण, तर कुठे बिर्याणी, मासे फ्राय, झणझणीत रस्सा असा बेत होता. दुपारी घरगुती जेवणावर ताव मारल्यानंतर अनेक खवय्यांसह तळीरामांनी सायंकाळपासूनच विविध हॉटेलांचा रस्ता धरला होता. बुधवार २४ जुलै रोजी आषाढ अमावस्या असली तरी सुट्टीचा दिवस नसल्याने बहुतेकांनी आज रविवारलाच पसंती दिल्याने आजच्या दिवशी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले.

काही तळीराम आणि खवय्यांची गटारी शनिवारपासूनच सुरू झाली आहे. समुद्र किनारे, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, भिवपूरीसारख्या पर्यटन स्थळांवर गटरीसाठी पर्यटकांची गर्दीही वाढली असल्याचे पहायला मिळत आहे.

पावसाळी मासेमारी बंद असल्यामुळे मासळी बाजारात आधीच दुष्काळ पडला आहे, त्यामुळे मासेही चढ्या दराने विकले जात होते. काही दिवसांपूर्वी सुरमई १२०० रुपये किलोने विकली जात होती, ती रविवारी दीड ते दोन हजार रुपयांवर पोहोचली. पापलेटचे भाव ऐकूनच
अनेक गिर्‍हाईक परतत होते. झिंगा ५०० रुपये किलो, तर मांदेली शंभर रुपये वाटा होता. मासळीचे भाव चढे होते. दरम्यान शहरातील हॉटेल, बार, रेस्टोरंट तर हावेवरील ढाब्यांवरही सायंकाळी गर्दी पहायला मिळाली.