पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, आदिम योजनांची यशस्वी अंमलबजावणी
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३,५३८ गोरगरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.
गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास, व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, आदिम, मोदी घरकुल योजनाच्या माध्यमातून आदिवासी, अनुसूचित जाती जमातीतील गोरगरीब, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक, दुर्बल घटकांना पक्क्या घरासाठी अर्थसहाय्य दिले जाते. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून गेल्या पाच वर्षात ठाणे ग्रामीण भागातील 13,538 गोरगरीब कुटुंबियांना या योजनांतून घरकुल मिळाले आहे.
केंद्र पुरस्कृत घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2016-17 ते 2021-22 या वर्षात 9,535 घरकुल ठाणे जिल्ह्यात मंजूर झाली. त्यापैकी 8,946 घरकुल पूर्ण करण्यात यश मिळाले असून 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्लक 589 घरकुल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
राज्य पुरस्कृत रमाई, शबरी व आदिम घरकुल योजनांच्या माध्यमातून २०१६-१७ ते २०२२-२३ साठी ९०६५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ४,५९२ घरकुले बांधून पूर्ण झाली. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्याला मिळालेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेण्यास सुरुवात केली होती. कामाची स्थिती, कोणत्या अडचणी येतात, आवश्यक साहित्य किंवा कुशल कामगारांची स्थिती यावर भर दिला. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणा पोहोचली आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. गटविकास अधिकाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली, असे शिसोदे यांनी सांगितले.