ठाणे: शुक्रवारी रात्री ठाण्यातील कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलावर वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी वाहतूक कोंडी टळली. भररस्त्यात बंद पडलेली कार स्वतः टोविंग केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, उपआयुक्तांच्या या कृतीमुळे वाहतूक पोलिसांची सकारात्मक प्रतिमा समोर आली आहे.
शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या देवेंद्र सुपेकर यांची कार ठाण्याच्या कॅडबरी उड्डाणपुलावर अचानक बंद पडली. वर्दळीच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी कार बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्याचवेळी ठाणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट पेट्रोलिंग करीत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी स्वतः पुढाकार घेत ते रस्त्यावर उतरले. तसेच, आपल्या शासकीय वाहनातील टोविंग बेल्ट काढून स्वतः त्या बंद कारला बांधला आणि लगेचच टोविंग करून ती कार उड्डाणपुलाखाली रस्त्याकडेला हलवली.
उपआयुक्त शिरसाट यांच्या या तत्परतेमुळे कोंडी टळून वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत त्यांनी वर्दीचा बडेजाव न मिरवता एका कुशल मेकॅनिकप्रमाणे मदतीचा हात पुढे केल्याचे दिसले. दरम्यान, त्यांनी त्या कार चालकाला महत्त्वाची माहितीही दिली. प्रत्येक चारचाकी वाहनामध्ये टोविंग हुकची सुविधा असते. परंतु अनेकांना याची माहिती नसते. शिरसाट यांनी कारमधील टोविंग हुक दाखवून त्याचा कसा उपयोग करायचा, हे देखील समजावून सांगितले.
वाहतूक नियंत्रणासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडे टोविंग क्रेनचे नियोजन आहेच. त्याचबरोबर १८ युनिटमधील प्रत्येक वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या पेट्रोलिंग वाहनात देखील टोविंग बेल्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. जेणेकरून अशा आपत्कालीन प्रसंगी बंद पडलेली वाहने तातडीने हटवण्यात येत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.