ठाणे: शहरातील उद्याने, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, पुलांखाली असलेली छोटी उद्याने आणि दुभाजकांमध्ये लावण्यात आल्या झाडे झुडपांची देखभाल करण्यासाठी ठाणे महापालिका ठेकेदाराची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला आवश्यक असलेल्या हिरवाईचे संगोपन होऊन शहराचे पर्यावरणही राखले जाणार आहे.
ठाणे शहरात सध्या १४४ उद्याने असून अनेक ठिकाणी हरित रस्ते आहेत. उड्डाणपुलांच्या खांबांवर वर्टीकल गार्डनही उभारलेले आहेत. मेट्रोखाली अतिक्रमण होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी लहान उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. दुभाजकांमधील मोकळ्या जागेत अनेक फूलझाडे लावली आहेत. या हिरवाईकडे दुर्लक्ष झाल्यास श्रम आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत पालिकेकडे असलेल्या उद्यानांनाही देखभालीअभावी अवकळा आली आहे. या साऱ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेने ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेने एकूण १३ निविदा काढल्या असून प्रत्येक प्रभाग समितींचा यामध्ये समावेश केला आहे. ठेकेदाराने रोज झाडांना पाणी घालणे, त्यांची स्वच्छता राखणे, ठराविक दिवसांनी झाडांची छाटणी, त्यांना योग्य आकार देणे, हरित रस्त्यांमधील गवताची देखभाल आणि छाटणी, उद्यानांची नियमित स्वच्छता आदी कामे ठेकेदाराला बंधनकारक असणार आहेत.
उद्यान देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून पालिकेस ७५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातूनच दोन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी पालिका १५ कोटी रुपये खर्च करणार आहे. ठेकेदाराने जबाबदारी पार न पाडल्यास दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.