लघु उद्योजकांच्या संकल्पना अर्थसंकल्पात उमटणार

ठाणे : ठाण्यात लघु उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सिडको एक्झिबिशन सेंटरच्या धर्तीवर भव्य एक्झिबिशन सेंटर उभारण्यात यावे, तशी तरतूद आगामी अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी लघु उद्योजकांनी ठामपा आयुक्तांना केली. या बरोबरच शहरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाची आखणी केली आहे. शुक्रवारी (30 नोव्हेंबर) या उपक्रमाचा शुभारंभ लघुउद्योजक क्षेत्रात काम करीत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेने करण्यात आला.

ठाणे शहरात लघुउद्योजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी ठाणे शहरात एक्झीबीशन सेंटर असणे आवश्यक असल्याचे माया वायंगणकर यांनी नमूद केले. सद्यस्थितीत ठाणे शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या व्यापारपेठा या छोट्या जागेत भरविल्या जातात, जर ठाण्यात एक्झीबिशन सेंटर निर्माण झाले तर सर्वच लघुउद्योजकांना त्याचा फायदा होईल अशी चर्चा यावेळी करण्यात आली. ठाणे शहरात सिडको एक्झीबिशन सेंटरच्या धर्तीवर या ठिकाणी एक्झीबिशन सेंटरचे नियोजन केले जाईल व त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

ठाणे शहराला ज्या 120 ई-बसेस मिळणार आहेत त्या बसेस ठाणे शहरातच चालविण्यात याव्यात, जेणेकरुन शहरातील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल यावर विचार करावा असे एकनाथ सोनावणे यांनी नमूद केले. तसेच परिवहन सेवेच्या बसेसची संख्या वाढविली तर नागरिक स्वत:चे वाहन आणणार नाही, पण त्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टची संख्या वाढविणे गरजेचे आहे. ई बसेस शहरात जास्तीत जास्त येतील या दृष्टीने प्रयत्न सुरू असून जानेवारीमध्ये जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर धावतील असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

वागळे इस्टेट येथे 75 पेक्षा अधिक आयटीपार्क असून या ठिकाणी दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या आहे, या ठिकाणी बसेसच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. बसेस विलंबाने येत असल्यामुळे या ठिकाणी सकाळ संध्याकाळ गर्दी होते. संध्याकाळी 6 ते 8.30 या वेळेत या परिसरात खूप गर्दी होत असल्याचा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला.

तसेच ठाणे स्टेशन येथून पोखरण तसेच शहरातील विविध ठिकाणी शेवटच्या लोकलला जोडून बसेस होत्या परंतु सध्या ही सेवा बंद असून लोकलला जोडून परिवहनची सेवा ठेवल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल अशीही सूचना बैठकीत करण्यात आली शहरातील नाले बंदिस्त (कव्हर) करुन त्यावर सोलर सिस्टीम बसविण्याबाबत महापालिकेने विचार करावा असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

ठाण्यातील नोकरी करणाऱ्या नागरिकांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणाघर आणि वृद्ध नागरिकांसाठी वृध्दाश्रम एकत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी. ठाणे महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करणे, तसेच या मुलांना स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणे, शाळाबाह्य मुलांना शिकविणे असे उपक्रम राबविण्याबाबत महापालिकेने विचार करावा असेही सूचित करण्यात आले.

या चर्चासत्रात ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशनचे उपाध्यक्ष भावेश मारू, संघटनेचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे, टीसा आणि कोसियाचे सदस्य सचिन म्हात्रे, टीसाचे सदस्य राजेंद्र आफळे, राघवेंद्र कोल्हटकर, माया वायंगणकर, निखिल सुळे आदी सहभागी झाले होते.