बदलापूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूर शहरात शिवकालीन इतिहासाच्या स्मृति जपण्याचे प्रयत्न होत आहेत. बदलापूर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. उद्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची बदलापुरात जय्यत तयारी सुरू आहे. सातारा येथून बदलापुरात पुतळा आणण्यात आला. त्यावेळी नगर परिषदेच्या पुतळ्याची थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, भाजपा शहराध्यक्ष शरद तेली, संजय भोईर आदींसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
उल्हासनदी काठावर बदलापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण केले जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याची आमदार कथोरे यांनी दिली आहे.
बदलापूरकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या लाडक्या बहिणींमध्ये दोन आदिवासी, दोन बंजारा, दोन गुजराती, दोन उत्तर भारतीय, दोन मराठी अशा विविध समाजाच्या महिलांचा समावेश असेल, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली.
बदलापूर ही छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराज घोडे बदलत असत, हा इतिहास असून महाराजांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर बदलापुरात आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून बदलापुरात शिवजयंती उत्सव साजरा होत असून या जयंती उत्सवाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भूषविले होते. आमदार कथोरे यांच्या संकल्पनेतून बदलापुरात इतिहासाच्या या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उल्हास नदी जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. उल्हासनदी ते बदलापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला शिवकालीन लूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला दगडी बुरुज, कमानी, दीपस्तंभ आदी सुशोभीकरण सुरू आहे. बदलापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचाही जिर्णोद्धार करण्यात येणार आहे.