विमानतळाला ‘दिबा’ यांच्या नावासाठी शेकडो वाहनांची महारॅली
नवी मुंबई: लोकनेते दि.बा.पाटील यांच्या १२व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भव्य कार बाईक आणि रिक्षा रॅलीचे आयोजन लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आलेले होते. यावेळी पालघर, ठाणे, मुंबई, उपनगर, नवी मुंबई आणि रायगड ह्या सागरी जिल्ह्यांमधून भूमिपुत्र आणि दिबा समर्थकांनी सहभाग नोंदवला.
रॅलीमध्ये ८००हून अधिक कार तर ३०० हून अधिक बाईक आणि रिक्षा यांचा समावेश होता, अशी एकंदरीत ११०० हून अधिक वाहनांची ही रॅली वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर जवळून सकाळी ११.३० वाजता सुरू झाली. त्यानंतर पाम बीचमार्गे रेती बंदर विमानतळ गेट ते दिबा पाटील विमानतळाला बाह्यवळण रस्त्यामार्गे वळसा घालून चिंचपाडा करंजाडे येथील कालभैरव मंदिरापर्यंत पोहचून २० किलोमीटर अंतर पार करून रॅलीची सांगता करण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकार स्तरावरील सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, राज्याचा नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडेही गेलेला आहे, मात्र केंद्र सरकारकडे प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे विमानतळ सुरू होण्यापूर्वी दिबा यांच्या नावाची अधिसूचना निघावी, तसेच विमानतळामध्ये होणारी नोकरभरती निःपक्षपातीपणे व्हावी ह्या मागणीला धरून केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आणि राज्य सरकारच्या नामकरणासंबंधी पाठपुराव्याला बळ देण्यासाठी रॅलीचे प्रयोजन करण्यात आलेले होते.
रॅली ही विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली होती आणि सदर रॅली दरम्यान भिवंडीचे विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक, माजी आमदार बाळाराम पाटील, राजेंद्र पाटील, आगरी कोळी यूथ फाऊंडेशनचे निलेश पाटील आणि त्यांचे सहकारी , सिडको प्रकल्पग्रस्त कृती समितीचे मनोहर पाटील, नवी मुंबई २९ गाव समितीचे दिपक पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे नंदराज मुंगाजी, संजय घरत आणि त्याचे सर्व सहकारी आणि पाचही जिल्ह्यातून आलेले आजी-माजी नगरसेवक, विविध संघटना प्रतिनिधी आणि दिबा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.