खुर्ची मिळाली परंतु गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही

उद्धव ठाकरे यांचे दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र

सिंधुदुर्ग: काही तरी करतील म्हणून दीपक केसरकर यांना मोठ्या अपेक्षेने मी शिवसेनेत घेतले. त्यांना मंत्रिपद दिले परंतु ते डबल गद्दार निघाले. आज ते सत्तेत असतील खुर्चीची उब त्यांना मिळेल. परंतु त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागलेला गद्दारीचा डाग कधीही पुसला जाणार नाही. ते इमानदार होऊच शकत नाहीत, असा आरोप आज येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीत पंतप्रधान मोदींचा झाडू घेऊन सुपडा साफ करायचा आहे. गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत आहात ना, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना घातली. यावेळी उद्धवसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी सावंतवाडीतून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी गांधी चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते भास्कर जाधव, गौरीशंकर खोत, सतिश सावंत, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाबुराव धुरी, मंदार शिरसाट, अतुल रावराणे मायकल डिझोजा रुची राऊत, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मी पुन्हा येईनच. परंतु आज जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी मी मन की बात नाही तर दिल की बात ऐकवणार आहे. मनात काळे कपट असू शकते, पण हृदयात नाही. त्यामुळे आपण त्या पद्धतीने शिवसैनिकांशी संपर्क साधणार आहे. त्यामुळे एक कुटुंबप्रमुख म्हणून मी तुमच्यात आलो आहे. यावेळी त्यांनी मंत्री केसरकर यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. ते म्हणाले, ते डबल गद्दार आहेत. एक चांगला माणूस आणि आठवड्यातून पंधरावड्यातून शिर्डीला जात असल्यानेच एक चांगला माणूस म्हणून मी त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला. ते चांगले काम करतील असे वाटले म्हणून त्यांना मंत्रिपद दिले. परंतु त्यांच्याकडे श्रद्धाही नाही आणि सबुरी नाही. त्यांनी आजपर्यंत एकाही पक्षावर श्रद्धा दाखवली नाही. आपल्याला काहीतरी मिळेल यासाठी सबुरी बाळगली नाही.