प्रारूप यादीवर ६७ हजार दुबार मतदारांचा भार!

* वेगवेगळ्या प्रभागात सहा हजार एकच नावे
* फक्त नाव आणि आडनाव असलेले तीन हजार मतदार
* शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला पर्दाफाश

ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्त्वाच्या गंभीर चुकांचा पर्दाफाश शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी आज केला आहे. ठाणे पालिका हद्दीत ६७,५०८ दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात ६,६४९ एकच नावे, फक्त नाव आणि आडनाव असलेले ३,४८५ मतदार याद्यांमध्ये आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी २७ नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली परंतु ठाणे महापालिकेने मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने हरकती घेण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर अशी करण्यात आली.

ठाण्यात मतदार यादीमधील गोंधळ मोठ्या प्रमाणात असल्याने एवढ्या कमी कालावधीमध्ये हरकती घेता येणे शक्य नसल्याने राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक आयोगाच्या काही चुका शोधून काढल्या. या चुका इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावे घुसविण्यात आले असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला. तसेच निवडणुक आयोग सरकारचे बटिक म्हणून काम करत असून निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच एसी कार्यालयात बसुन मतदार याद्या बनवल्या असल्याचा आरोप विचारे यांनी केला.

संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात मतदाराचे नाव किंवा आडनाव असलेले एकूण 3485 असे ईपीक नंबर सहित लिस्ट दाखवण्यात आली. यादीत नाव नसलेले परंतु ईपीक वोटर आयडी असलेले एकूण 1575 दाखविण्यात आले आहेत. 33 प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात दुबार मतदार असून ते दाखवण्यात आले नाहीत, असे ६७,५०८ मतदार श्री.विचारे यांनी उदाहरणासहित दाखविले आहेत. 33 प्रभागांमध्ये एकच नाव असलेली व्यक्ती दोन दोन प्रभागांमध्ये आहेत. ही संख्या 6649 एवढी आहे. एकच वोटर आयडी दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आढळून आले असून विधानसभेला ही नावे 8609 एवढी आहेत. ही नावे अंतिम यादीत पुन्हा टाकण्याची शक्यता श्री.विचारे यांनी व्यक्त केली आहे.

एका यादीत एकूण मतदार 1081 आहेत. त्यातील ओळख पटणारे 676 तसेच मयत 21 त्याचबरोबर ओळख पटतच नाही परंतु इतर प्रभागातून टाकण्यात आलेली एकूण 384 नावे निदर्शनास आली आहेत. शंभर वर्षापेक्षा जास्त वय असलेले 562 मतदार आढळून आले आहेत त्यामध्ये काहींचे वय कमी आहे परंतु 104 वय दाखवलेले आहे, काही मतदारांचे लिंग चुकीचे टाकण्यात आलेले आहे. या दुरुस्त्या करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.