सिव्हील रुग्णालयात डॉ. साळवे यांनी यशस्वीपणे केल्या १०२ शस्त्रक्रिया
ठाणे: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार असून जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत विशेष कक्ष नसताना येथील अस्थिव्यंग तज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी कमी सुविधा असताना गेल्या नऊ महिन्यांत १०२ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
शहापूरहून आलेल्या एका मातेच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे दोन्ही पायाचे पंजे उलटे होते. मातेला काय करावे सुचत नव्हते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. बाळावर उपचार सुरू झाले आणि अवघ्या काही दिवसांत बाळाचे पाय पुन्हा सरळ केले गेले. अशा एक दोन नव्हे तर अनेक अस्थिव्यंगावर शस्त्रक्रिया आणि उपचार मागील नऊ महिन्यांत ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिव्यंग तज्ज्ञ डाॅ. विलास साळवे यांनी केल्या आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी नव्याने प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे जीर्ण झालेली एक इमारत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व उपचार हे आपत्कालीन इमारतीमध्येच सुरू आहेत. विशेष कक्ष उपलब्ध नसतानाही ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचारी रुग्णांवर उपचार करत आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघातात जखमी किंवा अस्थिव्यंगाचे प्रकरण समोर येत असतात. या अस्थिव्यंगावर उपचारासाठी अस्थिव्यंग तज्ज्ञ डाॅ. विलास साळवे यांनी मागील नऊ महिन्यांत १०२ रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि उपचार केले. यामध्ये तीन लहान बाळ, पाच मनोरुग्ण आणि तीन कैद्यांचाही सामावेश होता. साळवे माणूसकी दाखवित अतिशय लक्षपूर्वक ते रुग्णांच्या प्रकृतीवर उपचार करतात असे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत केल्या जात आहेत. त्यामुळे या रुग्णांवर मोफत उपचार झाले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलाश पवार, मुख्य फार्मसी अधिकारी डाॅ. सुभाष पवार आणि महात्मा फुले जन आरोग्य विभागाचे डाॅ. संदीप ढुबे तसेच माझ्या सहकाऱ्यांशिवाय यांचा यामध्ये मोलाचा सहभाग आहे. यांच्याशिवाय या शस्त्रक्रिया पूर्ण करणे शक्य नव्हते, अशी प्रतिक्रिया डाॅ. विलास साळवे यांनी दिली.