घोडबंदर महामार्गावरील ‘बॉटल नेक’ होणार दूर

वनखात्याची जमीन ठामपाकडे होणार वर्ग

ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी वन विभागाची जमीन अखेर ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्याने घोडबंदर मार्गावरील प्रवास गतीने होणार आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून वनमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये घोडबंदर मार्गावरील मानपाडा, कासारवडवली व गायमुख या परिसरामध्ये वनखात्याची जमिन असून ती घोडबंदर महामार्गावर अड़थळा ठरत होती. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेला वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत होते. त्याबाबत आमदार श्री. सरनाईक व महानगरपालिकेचे अधिकारी वनखात्याकडे पाठपुरावा करीत होते. आज झालेल्या बैठकीमध्ये वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वनमंत्र्याचे प्रधान सचिव श्री. डी.वेणुगोपाल रेड्डी, अपर प्रधान सचिव विकास खरगे यांना सुचना देऊन ही जमीन ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिल्याने आता हा प्रश्न निकाली निघाला असल्याने लवकरच ठाणे महानगरपालिकेकडे ती जमीन हस्तांतरीत होणार आहे, त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुक समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.

मानपाडा, कासारवडवली, गायमुख या परिसरामध्ये येणारी वनखात्याची काही जमिन ही घोडबंदर महामार्गावर मधोमध येत होती. पूर्वी त्या जमिनीचा त्रास होत नव्हता, परंतु, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढल्याने, तसेच संबंधित जमिन ही मधोमध असल्याने पावसाळ्यात उंचावरून येणारे, दगड-धोंडे व मधोमध असणाऱ्या भिंतीवर तेथे भरधाव वाहणारी वाहने धडक दिल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत होते.

घोडबंदर महामार्गावरील वनखात्याची जमिन ताब्यात आल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी गटार व रस्त्याची बांधणी करून जनतेला हा रस्ता खुला करावा, अशी अपेक्षा आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला वनखात्याच्या जमिनीचा तिढा शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारमुळे यशस्वीपणे सोडविल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे श्री. सरनाईक यांनी समस्त ठाणेकरांच्या वतीने आभार मानले.