ठाणे : पंखात मांजा अडकल्यामुळे एक ब्लॅक हेडेड सीगल पक्षी खाडीच्या प्रवाहात उडण्यासाठी धडपडत होता. मात्र उडता येत नसल्याचे बघून ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी खाडीत झेपावत पक्ष्याला सुखरूप बाहेर काढले. पंखात अडकलेला मांजा काढून त्यास जीवदान दिले आहे.
ठाणे पूर्व विसर्जन घाट परिसरात खाडी किनारी मॉर्निंग वॉक करण्यासाठी ठाणेकर येतात. ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे हेदेखील दररोज येत असतात. त्यावेळी एक पक्षी खाडीत उडण्यासाठी धडपडत असल्याचे भरत मोरे यांच्या निदर्शनास आले. प्राणी पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या मोरे यांनी खाडीत पोहत जाऊन त्याला सुखरूप बाहेर काढले. पंखात मांजा अडकला होता. हा ब्लॅक हेडेड सीगल पक्षी जखमी झाल्यामुळे उडताना त्रास होत होता. परंतु थोड्या उपचारानंतर त्याने पुन्हा आकाशात भरारी घेतली.
भारतात लडाख, चायना, सैबेरिया, युरोप, कस्प्रियन समुद्र या ठिकाणाहून सात ते आठ प्रकारचे सीगल्स भारताच्या विविध भागात दिसतात. या पैकी ठाण्यात ब्लॅक हेडेड आणि ब्राऊन हेडेड गल बघायला मिळतात. या पक्ष्याला मासे खायला आवडत असल्यामुळे ठाण्याच्या काही तलावात या पक्ष्याची रेलचेल बघायला मिळते आहे. या सोबतच लहान खेकडे, कोलंबी सारखे जलचर हे त्यांचे नैसर्गिक खाद्य आहे. मात्र या पक्ष्यांना नागरिक मानवी खाद्याची सवय लावत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.