शरद पवार यांचे कल्याणात प्रतिपादन
कल्याण : शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा महत्त्वाचा विषय असून समाजातील शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. हे सार्वत्रिकरण होण्यासाठी अनेकांनी बरेच वर्षे कष्ट घेतले असल्याचे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
कल्याणातील एका खाजगी शाळेच्या ऑडिटोरियमचे उद्घाटन शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले. यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान शाळेतील उद्घाटन समारंभाला येण्यापूर्वी शरद पवार यांनी प्रवक्ते महेश तपासे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्याठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी शरद पवार म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्ञानदानाचे काम सुरू केले. त्यांचा हा ज्ञानदानाचा वसा आम्ही एकत्रितपणे चालवत आहोत. काही शैक्षणिक संस्था तर अशा आहेत, ज्या 150, 100 ते 75 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य एखाद्या व्रताप्रमाणे करत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिले आहे. 100 वर्षांपूर्वी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. त्या संस्थेच्या अध्यक्षपदी आपण असून कर्मवीरांचे विद्यादानाचे हेच काम आम्ही सर्व मिळून एकत्रपणे करत असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
या रयत शिक्षण संस्थेमध्ये आज चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून 70पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. ठाणे जिल्ह्याच्या टोकाला तलासरीमध्येही या संस्थेची शाळा ज्ञानदानाचे काम करत आहे. ग्रामीण भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणे ही तुमची आणि आपली जबाबदारी असल्याचे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान कृष्णराव धूळपांमुळे कल्याणचा आणि आपला जुना ऋणानुबंध जुळल्याचे सांगत त्यांनी धुळप यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.